सोमवार, ६ एप्रिल, २०२०

#शिरवाळ पडतं तेव्हा...

प्रचंड उन्हाळा आहे...ऊन रखरख करत आहे...उष्णता मी म्हणत आहे...उकडून उकडून अंगाची लाहीलाही होत आहे...रस्ता पूर्ण रिकामा आहे...नजर टाकली तर चिटपाखरूही दिसत नाहीये... दूरवर कुठे डेरेदार सावली देईल असं झाडही दिसत नाहीये...क्षणभर विश्रांती घेता येईल असं निष्पर्ण झाडसुद्धा नाहीये...दूरपर्यंत कुठे मानवी वस्ती नाहीये...उन्हातान्हात चालून घशाला कोरड पडली आहे...आता कधी एकदा मुक्कामाचं ठिकाण येतंय आणि जीवाला विसावा मिळतोय असं झालंय...असंख्य पावलं चालून देह थकला आणि आतातरी पाणी किंवा झाड येईल अशी आशा ठेवत एवढ्या भयंकर जीवघेण्या उन्हात चालूनचालून दमून, पाण्याशिवाय घशाला कोरड पडून आता लवकरच जीव जाईल आणि इथंच तापलेल्या मातीत अंग कोसळेल असं वाटत असतानाच,सगळी आशा मावळत असतानाच,अचानक एखाद्या ढगाने सूर्य झाकोळला जातो...रखरख करणारं ऊन अचानक गायब होतं...आणि थोड्या काळासाठी परिसरात सावली पसरते...अंगाची लाहीलाही करणारी उष्णता थोडी कमी होते...घामेजून गेलेल्या अंगाची आणि कोरड पडलेल्या घशाची तगमग थोडी कमी होते...आत्ता थोड्याच वेळात आशा संपून,दमून जीव जातोय असं वाटून अंग कोसळणार असं जाणवणाऱ्या मनाला पुन्हा उभारी आली...पुन्हा थोडे अजून अंतर चालण्यासाठी पावलात बळ आलं... अजून एकदा चालण्याची आशा बळकट करणारी धमक जागी झाली...निराशेचं मळभ दूर झालं... एवढं सगळं फक्त एका काही क्षणांसाठी आलेल्या आणि जीवघेण्या सूर्याला रोखून मायेच्या छायेचं छत्र धरणाऱ्या काळ्याशार ढगामूळे शक्य झालं...
यालाच निराशेच्या उन्हात दमलेल्या,क्षीण झालेल्या मनात आशेची झुळूक निर्माण करणारं, क्षणभर मनाला गारवा देणारं 'शिरवाळ' म्हणतात...
आयुष्यात असंच निराशेची धग कमी करून चालायची धमक पुन्हा निर्माण करणारं 'शिरवाळ' हवं असतं... ते मिळतं घडणाऱ्या घटना, भेटणारी माणसं यांच्या रूपानं...
--चि.दया✍️✍️

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...