सोमवार, १० डिसेंबर, २०१८

#मनातले चांदणे

     मी 6वी ला असताना बालभारतीला एक 20वा धडा होता-'मनातले चांदणे'.
त्यात एक झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा-बल्लव सकाळी सकाळी पेपर वाटायला यायचा.तो एकदा त्या लेखकाला म्हणाला, सर, मी तुमच्याकडे अधूनमधून येत जाऊ?
तुमच्या अंगणातुन चांदणे खूप छान दिसते.
तो अधेमधे चांदणं पाहायला यायचा.
नंतर काही वर्षे उलटली.एके दिवशी अचानक लेखकाला एक पत्र आलं; त्यात  त्यानं चांदण्याच्या आठवणी आणि त्यानं अनुभवलेलं आयुष्य याबद्दल भरपूर लिहिलेलं असतं.लेखक खूप भावुक होतात.
नंतर लेखक त्याला पत्रानं उत्तर देण्याच्या इराद्यानं मजकुराच्या शेवटी पाहतो तर त्यात पाठवणाऱ्याचा म्हणजे बल्लूचा पत्ताच नसतो...बल्लव म्हणजे बल्लू ने पत्र पत्त्याशिवायच पाठवलेलं असतं... त्यावेळेस लेखकाला थोडं दुःख झालं...मलासुद्धा लहानपणी फार काही कळत नसूनही हा धडा वाचताना कसंतरी व्हायचं, शेवटीशेवटी भावुक व्हायचो मी...एक अनामिक हुरहूर लागून राहायची मनात...

#आज ऑफिस मध्ये असंच एक निनावी पत्र पाहून ते मंतरलेले दिवस आठवले...

#मनातले चांदणे

सोमवार, ३ डिसेंबर, २०१८

#रेडिव

"नमस्कार! आकाशवाणी 'पुणे'...सादर करत आहोत, कार्यक्रम ' गीतसंगीत'...असं ऐकलं की खूप भारी वाटायचं..."बहुजन हिताय...बहुजन सुखाय...बहुजनकल्याणी...आकाशवाणी..." हेतर पाठच झालं होतं....तर वरचा पप्पांनी घेतलेला Philips चा रेडिव...खरंतर आम्ही रानात राह्यला हुतो आणि तिथं लाईट नव्हती...मग Nippo चे सेल लावून रेडिव चालायचा...रोज सकाळी उस्ताद बिस्मिल्ला खान किंवा इतर कोणी यांची शहनाई लागली की झोपेतून उठायचे लोक...आणि एक 'खूप मस्त धून लागूनच दिवस सुरू व्हायचा... तीच धून मी alarm tone म्हणून लावतो अलीकडे....सकाळी सकाळी मस्त भक्तिगीते लागायची...'अबीर गुलाल...उधळीत रंग...' पासून ते होनाजी बाळा यांच्या ' घनश्याम सुंदरा... श्रीधरा' पर्यंत...दिवसभर तेच गुणगुणत असायचो...
6.15 ला 'संप्रति वार्ताह शुयंताम' असं काहीतरी संस्कृत बातम्यांचं लागायचं... नंतर दिलखुलास हा 'दिलखुलास' माणसांचा कार्यक्रम लागायचा.... अनेक हुरहुन्नरी नमुनेदार माणसं तिथं भेटायची...
पूर्वी रेडिव वर मॅच लागायची...मला भयंकर नाद होता मॅच चा...मॅच च्या दिवशी मी आमच्या म्हशी चरायला घेऊन जायचो...म्हशीवर बसून प्रवास करत असताना एकदा रेडिव पडून थोडा जखमी झाला हुता...आणि पप्पानी नंतर मला पाठीवर 2 पुरस्कार पण दिले होते...तर मग पुस्तक वाचत वाचत मॅच पण ऐकायचो मी...म्हशी तो आवाज सोडून कुठं जात नव्हत्या...पण नंतर नंतर रेडिव खराब झाला आणि मॅच बघणं पण लैच बोअर व्हायला लागलं...तेव्हा जे मॅच बघणं सोडलं ते सोडलं...आत्ता क्रिकेटविषयी फारसं काही माहीत नाही...असो...तर आकाशवाणी पुणे...'अमुक अमुक' प्रादेशिक बातम्या देत आहेत असं ऐकलं की आम्ही सगळे चिडीचूप शांत...आणि मग कान देऊन सगळं ऐकायचो...रात्री झोपताना पुन्हा छायागीत किंवा भुले बिसरे गीत असं लागायचं... 'आप सून रहे है विविधभारती', 'हॅलो आपकी पसंद', मधली ती रेडिव जॉकी माझी 'पसंद' होती...म्हणजे तिचा आवाज माझ्या बालमनाला खूप आवडायचा...😜
याच रेडिव नं मला गाणं ऐकायचा महाभयंकर नाद लावला...आणि जगण्याला खरं इंटरेस्टिंग बनवलं...

डास आणि मी

#डास आणि मी...
   राज्याचा कारभार आटोपून थोडंसं दमून राजवाड्यात पाऊल टाकलं की लगेच बिछाना जवळ करतो...थोडंसं गरम व्हायला लागतं म्हणून अंगावरचे राजवस्त्रांचे ओझे थोडे कमी करून आणि खिडक्या उघडून मस्तपैकी राजगादीवर अंग झोकून द्यावे...आणि काहीच वेळात...या नामी संधीचा फायदा घेण्यासाठी डासांची एक फौज राजकुमाराच्या गाफील असण्याचा फायदा उचलत सहकुटुंब तुटून पडते...नुकतेच गुलाबजामुन खाल्ले असल्याने राजकुमाराच्या रक्तात पण गोडवा आलेला असतो...सगळे डास एकदम मिटक्या मारीत रुधिरशोषण करत असतात...आणि मग अचानक गडाचे बुरुज कोसळायला लागल्याची जाणीव झाली की राजकुमार उठतो आणि भयंकर अस्वस्थ होतो...आणि जोपर्यंत त्या डासांचा शिरच्छेद करत नाही तोपर्यंत झोपणार नाही असा चंगच मनी बांधतो...आणि मग सुरू होते शोधाशोध... आणि भिंतीवर-पुस्तकांवर-कपड्यांवर सगळीकडे शोधमोहीम सुरू होते... तेवढ्यात एकदम 2 डास मांडीवर येऊन बसतात आणि तत्क्षणी दोन्ही हात त्यांच्यावर आक्रमण करतात...आक्रमण करीत असतानाच त्याच्या दयाळू मनात त्या मुक्या जीवांना प्रेमाने गोंजारावं, असा दैवी विचार येतो पण तसं न करता उलट त्याहून अधिक प्रेमाने मुठीत घेऊन त्यांना लवकर स्वर्गप्राप्तीचे दरवाजे खुले करून देण्याचे पुण्यकर्म करूया या विचाराने जेव्हा हातांना त्या डासांच्या रक्ताचा अभिषेक होतो तेव्हाच आत्मा शांत होतो त्याचा...
"आणि मग आसुरी का असेना पण अगदी एखादं महायुद्ध जिंकल्यागत आनंद मनाला होतो"
#एवढी हिंसा कधीकधी करतो मी...😓

शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१८

#माझा निकाल नव्हे Result...☺️

*हाच तो दिवस...

23/11/2017....09.20 PM…. या मुहूर्तावर आमचा PA 2013-14 बॅच चा निकाल लागला...सॉरी, म्हणजे रिझल्ट लागला...त्याला आज बरोबर 1 वर्ष झालं...
सेन्ट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये येऊन बघता बघता वर्ष झालं राव आज...
     तर...खरेतर त्यादिवशी Result च्या शक्यतेमुळं अक्खा दिवस मी जेवलोच नव्हतो...संध्याकाळी भेंडी खायला बसलो आणि मित्राचा फोन आला, दया लका आपला निकाल लागला...मी जरा घाबरलोच...मग तो जेव्हा म्हणाला की निकाल म्हणजे Result आला आहे तुझा...तू आलाय लिस्ट मध्ये...तेव्हा मला खूपच कसंतरी व्हायला लागलं...आनंद सहन झाला नाही मला..आणि जेवण अर्धवटच सोडून मी बाहेर पडलो...खरंतर ज्या गोष्टीची कित्येक दिवस वाट पाहिली होती...जिल्हा कोर्ट टू High Court व्हाया CAT आणि शेवटी Reexam असे बरेच क्रियाकर्म करून शेवटी तब्बल 2014-2017 या 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही 1200 लोकं सर्व्हिस मध्ये आलो...त्यादिवशी काहीच कळत नव्हतं आणि झोपलो तर अजिबातच नव्हतो...पण आनंदात मी बऱ्याच उड्या मारल्या...बरेच दिवस कोणाला सांगितलं नव्हतं कारण अजून मनात धाकधूक होती रीतसर ऑर्डर येईपर्यंत...पण शेवटी बातमी फुटलीच...आणि मग आम्हाला फोनवर फोन येऊ लागले...तू एका खूप मोठा इतिहास आणि वारसा असलेल्या आणि भारताच्या महत्वाच्या धमन्यांपैकी एक नस असलेल्या  Department चा भाग झाला आहेस...अभिनंदन!...
आणि मग आमचाही निरंतर आनंद बहुगुणीत झाला आणि नंतर चिरंजीवच झाला...

#आज आपल्या पोस्ट डिपार्टमेंट चा भाग होऊन 1 वर्ष झालं त्याची आठवण...
-दया✍

सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१८

नारळ

#12 वी...(यत्ता बरंका😅)
#नारळ
   मी लहान असताना 12वी ला होतो...तेव्हाच्या काळी एकदा सुर्यवारी मी कपडे धूत बसलो होतो किंवा बसून कपडे धूत होतो...😄...मस्त 90's मधली गाणी लावून मी कपडे धुण्याचा आनंद घेत होतो...तितक्यात माझ्या डोक्यात...सॉरी,  डोक्यावर काहीतरी पडलं... आणि लहान मेंदू गळपाटला...आणि मला झिणझिण्या येऊन रागाचा पारा भलताच चढला...सुदैवाने जवळ कोणी नव्हतं नाहीतर मी त्यालाच तो नारळ फेकून हाणला असता...पण, तसा नारळ अजून बारीकच होता...माझ्यासारखा अवखळ...पण पिकण्याआधीच माझ्या डोक्यावर पडला...वारं खूप होतं ना म्हणून...त्यामुळं फक्त नारळाची कुटुंबाला आठवून माझा थोडा राग कमी झाला...
...आणि काय दुर्दैवी योगायोग आहे बघा...मी त्या काळी 'संध्यानंद' हा एक 'मजेशीर' पेपर वाचत असायचो...
नेमकं त्याच दिवशी मी 'संध्यानंद'मध्ये वाचलं...की नारळाला डोळे असतात आणि त्यामुळे तो कोणाच्याही अंगावर(Including  डोकं) पडत नाही...
मी भयंकर संतापलो...पेपर हातात घेतला...छान गुंडाळला...आणि मग त्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावणारच; तेवढ्यात मित्र म्हणाला, दया लका एवढी हिंसा बरोबर नाही, तुझ्यासारख्या 'दयानंद' माणसाला असं निर्दय झालेलं पाहिलं की...आणि त्यात सोलापुरात दुष्काळ, पाणी 5-5 दिवस येत नाही...मग ऐनवेळी संकटाच्या प्रसंगी पेपर लागला तर?...जरा दूरदृष्टी ठेव लका...आणि त्याचं ऐकून मी तो पेपर दूर दृष्टीलाच ठेवला... बरेच दिवस गॅप पडला होता...आज पुन्हा तो दिसला...तो दिसला अन् मी पाहिले...पाहिले परी ते कुर्र्याने...(मराठी गाणं आहे असं एक)...पुन्हा एकदा भूतकाळात डोकावून पाहिलं(डोक्यावून नव्हे)...😅😅
आणि आत्ता कपडे धुणं बंद झालं असलं तरी...कधीकधी कपडे धुताना आधी मी वर बघतो मग कपडे धुवायला सुरुवात करतो...
आधी कपडे धुताना फक्त घरची आठवण व्हायची...आज घरची आणि त्या नारळाची पण आठवण होते...😄

रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

Post Diary

#UCR

आपल्या पोस्ट खात्यात एक खूप छान पद्धत आहे आणि ती प्रत्यक्ष जीवनात सुद्धा खूप लागू पडते...
जेव्हा आपल्याला पैसे एक्सेस होतात...त्याचा नक्की संदर्भ
सापडत नाही, सोर्स चा निश्चित ताळमेळ लागत नाही...तेव्हा Unclassified Receipts (UCR) म्हणून ते हिशोबात घेतो...आणि मगच आपला डेली अकाउंट टॅली होतो...आणि UCP चंही तसंच आहे...व्हाईस व्हर्सा...
तसंच प्रत्यक्ष जीवनात सुदधा काही चांगल्या गोष्टी आयुष्यात मिळाल्या तर त्या  UCR म्हणून आपल्या DAILLY ACCOUNT ला जमा कराव्यात आणि तो हिशोब तिथेच सोडून द्यावा...नव्या डेली अकाउंट वर त्याचं सावट नसावं...सुदैवानं आपल्याला प्राप्त झालेल्या या गोष्टींना 'उपकार' किंवा 'ऋण' असे प्रमाणपत्र बहाल करून स्वतःला फालतू ओझ्याखाली दबू देऊ नये......आणि आपण जेव्हा कोणाला काही देतो तेव्हा ते Unclassified PAYMENTS म्हणून द्यावं...त्याला 'उपकार' किंवा 'ऋण' याचं सर्टिफिकेट लावु नये...'कोणावर तरी उपकार करत आहोत' असं फील बिलकुल नाही करायचं...
थोडक्यात काहीही नैसर्गिकरित्या आपल्याला मिळालं म्हणजे 'भाग्य' किंवा लक म्हणून उड्या मारण्यात...आणि काहीही अपघाताने आपण गमावलं तर दुःख करण्यात काहीच अर्थ नाही...
थोडक्यात ज्याला आपण नशीब कींवा दुर्दैव म्हणतो अश्या सर्व 'प्राप्त' आणि 'लुप्त' दोन्ही गोष्टीत आपलं काहीच कर्तृत्व नसतं किंवा आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी असतात त्या...
त्यामुळं जे मिळालं त्याबद्दल गर्व आणि जे गमावलं त्याबद्दल खेद करण्यात काहीच अर्थ नाही...
त्यामुळं UCR आणि UCP करत राहिलो तर दैनंदिन खाते नीट जुळेल आणि भविष्यात स्वतःकडून आणि समाजाकडून होणाऱ्या Inspection मध्ये काही प्रॉब्लेम आले किंवा काही अपवाद घडला तर आपण  सहीसलामत सुटून जाऊ...आणि UCR, UCP टेक्निक मुळे आपल्याला मग जास्त काही लक्षात ठेवायचीही गरज पडणार नाही...काही गोष्टींचा अजिबातच हिशोब ठेवायचा नसतो त्या गोष्टी UCR ,UCP केल्या तर त्यामुळं मेंदूला फक्त खऱ्या नितांतसुंदर गोष्टीच लक्षात ठेवाव्या लागतील...

#आणि मग जीवन सुंदर आहेच...
#आपल्याच कामातून शिकायचा छोटा प्रयत्न...
#PostDiary...

तम...बाखू...

#तम...बाखू...
   एसटीत खांबाला टेकून उभं राहण्यासाठी तुंबळ, अगदी घनघोर लढाई सुरू असते...एकमेकांच्या आईबापांचं स्मरण मोठ्या प्रेमानं आणि आदरानं सुरू असतं...बाकीचे रसिक प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध होऊन ती जुगलबंदी ऐकत असतात...तर ही सगळी आदरांजली वाहणं चालू असतानाच एकजण हे भांडण मिटवायचा खूप प्रयत्न करतो पण यश काही येत नाही...मग तो आपला हुकमी एक्का बाहेर काढतो...खिशातून 'गायछाप' हे वादशामक अस्त्र बाहेर काढतो...आणि मग म्हणतो आत्ता थोडं थांबा...एक बार भरू आणि मग भांडा... चुना हाय का वं?....हाय की...ही घ्या...पण जरा वाळलाय...काय हरकत नाही...द्या...तुम्हाला हो?....देऊ का मळून?...तो द्या....मग ह्यांच्या,  तुम्ही कुठलं....मी हितला...म्या लेकीकडं गेलो होतो...तुम्ही?
म्या आमच्या तिला भेटायला गेलो होतो...असं बोलत बोलत शेवटी त्या दोघांमध्ये 'गायछाप' या एका जादूने समझोता करार घडवून आणला....आणि मग मीपण कालव्यातून सुटकेचा निःश्वास सोडला...असो...
*"सुहाना सफर है यह"

तर, "तंबाखू हा लोकांना एकत्र आणणारा, चालू भांडण थांबवणारा, मैत्री जपणारा एक कमी खर्चिक असा राष्ट्रीय दुवा आहे" असं निदान आज DR.Mane यांना झालं आहे...

#एसतीचा प्रवास...
#इथं लय लय मजेशीर लोकं हायेत राव...गावाकडं...

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

#मोटिव्हेशन

#मला पडलेला बालिश प्रश्न(निमित्त बालदिन)

आजकाल Motivational speakers, Workshops यांची खूप चलती आहे...कित्येक तर फक्त एवढेच काम करतात आणि लक्षाधीश होतात...इतकं हे क्षेत्र विस्तारत आहे...मला प्रश्न पडतो की पूर्वी असे काही नव्हते तरी लोक मनापासून, आपल्या कामाचा आणि जीवनातील घडामोडींचा आनंद घेत होते...त्यांना अशी काही motivational Speeches ची गरज पडत नव्हती...कारण ते अंतःप्रेरित होते...आजही असे खूप आहेत...तर मला नेहमी प्रश्न पडतो की लोकांना सतत,नेहमीच या बाहेरून घेतलेल्या उसन्या motivation ची गरज का पडते?
काही महाशयांना तर रोजच हे motivation लागते...त्याशिवाय दिवस सुरूच होत नाही...किती दिवस चालणार हे?...आपल्याला दुसऱ्या कोणीतरी प्रेरणा द्यावी हि अपेक्षा तर का ठेवावी?...स्वतःच स्वतःसाठी motivation का नाही बनु शकत? आजकाल कोणीही आपल्याला सतत motivate करायला फ्री नाहीये(काही लोक सोडून...इथे मी कोणालाही blame करत नाही की दूषण लावत नाही हे लक्षात घ्यावे). काही वेळेस ठीक आहे हो...एखाद्या वेळेस एखादी सत्यकथा खरंच प्रेरणा देते पण तेही कित्येकदा क्षणिक राहते...पण मी पाहिले की काही लोकांना हे inspiration बाहेरून मिळवायचे व्यसनच लागले आहे...साधी गोष्ट आहेहो...एक आईवडील आणि तुम्ही स्वतः(आणि काही कर्तृत्वसंपन्न व्यक्ती) सोडले तर तुम्हाला जगात दुसरे काहीच permanantly inspire करू शकत नाही...(काही सन्माननीय अपवाद वगळता...हाहाहा😄)
आपल्याला रस्त्याने जाताना काही 'सेल्फ हेल्प' पुस्तके दिसतात...(पाहण्यास वेळ मिळालाच तर FC रोड ला पण दिसतात) "तुम्ही सर्वश्रेष्ठ उद्योगपती होऊ शकता", "स्वतःला ओळखा", U r the Winner"
"1 महिन्यात श्रीमंत व्हा", "दोन दिवसात Leader व्हा" अशा type ची पुस्तके आपण विकत घेतो आणि नंतर समजते आपण '----' बनलो आहोत...(काही चांगली पण असतात बरंका...वाचावी जरूर)...
आणि काही नवीन नाही...तुम्ही करू शकता...तुम्ही जिंकू शकता...स्वप्न पाहा...ते सत्यात उतरावा...असलं...ते तर आम्हाला लहानपणा पासून आईपप्पा सांगत आले आहेत ना...पण ते कधीच विसरून गेलो आम्ही...या धावपळीत...साधी गोष्ट आहे...conductur सुद्धा नेहमी म्हणतो, पुढे चला...यातून पण प्रेरणा मिळते(घेतलीच तर)....आणि simple funda... आपली आई सांगते बाळा, तू आमच्यासाठी तू कायम बाळ आहेस आणि असंच तुझ्यातील बालक जिवंत राहूदे(मरेपर्यंत जिवंत) आणि तू आत्त्ता आहेस असाच पागल(म्हणजे जीवनवेडा) राहा...खूप खुश राहशील.....तर एका movie मध्ये dialogue आहे..."शादी किसिकी भी हो, मेरा दिल गाता है"...तसे, काहीही होवो...आपण गात राहायचे स्वतःचेच गीत...कोणी गीतकार कशाला हवा...?
--दया✍✍
14/नोव्हें/2017

सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१८

गारवा...

द्रौपदी कडे एक अन्नाचे अक्षय भांडे होते...
तसे मलापण एक गरम पाण्याचे अक्षय भांडे मिळावे...
काय राव अंघोळीला गेलो की गरम पाणी पुढच्याच मिनिटाला संपते...आणि घोर निराशा होते...
लहानपणी आमच्याकडे एक टब होता...आई मला त्यात गरम पाणी द्यायची आणि मी तासनतास त्यात मनसोक्त डुंबायचो... पाणी संपतच नव्हते...पाणी गार होईपर्यंत मीपण गार होत नव्हतो...पण आत्ता पाणी संपलं की माझ्यासारखा माणूस पण लगेच गार होतो...थंडीमुळं...😅...आणि मग कुडकुडत पाय नाचवत घरात जातो...आणि मग काही वेळ वरचा दंतसमुच्चय खालच्याशी झगडत
राहतो आणि एक मंद असा कडकड कडकड आवाज थंडीचा फील अजून वाढवतो...आणि या दिवसात हात तर अजिबातच चालत नाहीत...गाडीवर तर भयंकर गारवा लागतो...हातांना काही संवेदनाच जाणवत नाहीत...
तोंड पूर्ण पॅक केल्यामुळे ओळखीची, जवळची माणसे पण ओळखू येत नाहीत आणि मग नंतर या बोचऱ्या, त्रासदायक पण हव्याशा थंडीचाच काही वेळासाठी राग यायला लागतो...कारण या गारव्यात जर का मुका मार लागला तर...अगंगं...लैच बेक्कार लागतं...
असो...
#नेमेची येतो गारवा...
#थंडी गुलाबी, हवा ही शराबी...

शनिवार, १० नोव्हेंबर, २०१८

सहजच...

शुभेच्छांना निमित्त कशाला हवं?
Happy Everyday...

तर ज्यांना ज्यांना आपण जन्मदिन, लग्न किंवा इतर पराक्रम यांसाठी शुभेच्छा प्रत्यक्षपणे देऊ शकलो नाही त्यांना 'सदासर्वदा अनंत शुभेच्छा' असं सांगूंया आणि त्यांच्याशी पुढील संवाद करूया...

शुभेच्छा द्यायला किंवा भेटायला किंवा फोन करायला निमित्त शोधणं किंवा औपचारिकता पाळणं हे आजकाल नकोच वाटायला लागतं...केवळ नाईलाज म्हणून काही Formalities पाळाव्या लागताहेत...पण सहज, स्वाभाविक जगण्याचा भाग म्हणून इंफॉर्मल आणि नैसर्गिक वागणंच आवडू लागलं आहे...जरी ते जमण्यात अडथळे येत असले तरीही...खरेतर परिस्थिती आणि कार्यक्षेत्र बदलले की माणसाचे प्राधान्यक्रम बदलत असतात...त्याला वेळ तेवढाच 24 तास, मर्यादित असतो पण त्या तुलनेत साधण्याची उद्दिष्टे असंख्य असतात...ही सर्व प्राप्त करायची म्हटलं की प्रचंड ओढाताण आणि दमछाक होते...त्यामुळे प्रत्येकच माणसाला आणि प्रत्येकच कार्याला वेळ देणं खूपच अवघड आहे...सर्व गोष्टी, सर्वच माणसांना आपण Satisfy करू शकत नाही...नव्हे ते सर्व समाधानी होऊच शकत नाहीत...त्यामुळे स्वाभाविक प्रवाहात जगताना ओढाताण होऊ न देता सर्वोच्च प्राधान्यक्रमच फॉलो करावा...बाकी महत्वाच्या पण तुलनेने दुय्यम प्रधान्याच्या गोष्टी वेळेविना आणि मानवी मर्यादांमुळे बाजूला ठेवाव्या लागतात...
त्यामुळे आपल्याच प्रियजनांचा असा समज होणं साहजिक आहे की..."तू खूप बदलला आहेस, तू पहिल्यासारखा राहिला नाहीस इत्यादी इत्यादी..."...तसेतर त्यात प्रियजनांचा पण दोष नाही...त्यांचंही प्रेम असतंच आपल्यावर...फक्त ते आपल्या सद्यस्थिती आणि वास्तविक अक्षमतेला समजू शकत नाहीत हेच ते दुर्दैव...खरेतर कोणालाही दुखवायचं नसतं आपल्याला... सगळेच आपल्याला हवे असतात... पण...वेळ आणि आवश्यक कार्यांच्या बंधनामुळे इच्छा असूनही ते शक्य होत नाही...सगळ्यांनाच भेटावं, सगळेच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी व्हावेत, खूष राहावेत असं वाटतं... आणि आपण कोणालाही विसरलेलो नसतो...एवढं प्रेम करणाऱ्या माणसांना आपण कसं विसरु शकेल!
पण प्रत्येक ठिकाणी तितकीच प्रेमळ, जीव लावणारी असंख्य माणसं भेटत जातात. त्यामुळे पूर्वीच्या माणसांना देऊ शकणारा वेळ कमी होत जातो आणि पर्यायाने आपण खूप कमी लोकांच्या वाट्याला येतो...आणि नेहमीच बोललं पाहिजे, भेटलं पाहिजे एवढ्या फॉर्मलिटी पेक्षाही खूप व्यापक नातं असलं पाहिजे...जेव्हा म्हणून त्याला अवकाश देणं शक्य आहे तेव्हा ते जपायला हवे...आणि फक्त Formality पाळल्या नाहीत म्हणून दूर होऊ एवढं आपलं नातं कमजोर आहे का?
हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा...जिथंही असू, शक्य असेल तेव्हा भेटत राहावं...आणि जमिनीवरचं अंतर आपल्यात आणि प्रियजनांत अंतर नाही आणू शकत...आपले सर्वच प्रियजन एकमेकांच्या मनात असायला हवेत..."त्यांच्याकडून माझ्या अपेक्षापूर्ती पेक्षा, माझ्या प्रियजनांचे समाधानी, संतोषी जगणे आणि ते सगळे त्यांच्या प्राथमिक विश्वात खूष राहणं हे मी महत्वाचं समजतो"
हे स्वतःला सांगावं...
बाकी आपण त्यांना किंवा ते आपल्याला अवकाश(स्पेस) देऊ शकत नसतील तर त्यात वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नसावं...फक्त एकमेकांचं ओरिजिनल बिहेवीयर, स्वभाव बदलू नये..जीवनात केव्हाही प्रत्यक्ष भेटेल तेव्हा तो उत्साह,ती उस्फूर्तता, ते चैतन्य, जगण्यातली संपन्न उर्मी जिवंत भेटायला हवी... बस्स...
Happy Everyday...
शुभेच्छा...😘
चला...काळजी घेऊयात...
---✍ चि.दयानंद

# माणसे वाचत असताना आलेला अनुभव शब्दबद्ध केला आहे...

#मला वाटलं म्हणून...

शुभेच्छांना निमित्त कशाला हवं?
Happy Everyday...

तर ज्यांना ज्यांना मी जन्मदिन, लग्न किंवा इतर पराक्रम यांसाठी शुभेच्छा प्रत्यक्षपणे देऊ शकलो नाही त्यांना 'सदासर्वदा अनंत शुभेच्छा'...

शुभेच्छा द्यायला किंवा भेटायला किंवा फोन करायला निमित्त शोधणं किंवा औपचारिकता पाळणं हे आजकाल जरा नकोच वाटायला लागलं आहे...केवळ नाईलाज म्हणून काही Formalities पाळाव्या लागताहेत...पण सहज, स्वाभाविक जगण्याचा भाग म्हणून इंफॉर्मल आणि नैसर्गिक वागणंच आवडू लागलं आहे...जरी ते जमण्यात अडथळे येत असले तरीही...खरेतर परिस्थिती आणि कार्यक्षेत्र बदलले की माणसाचे प्राधान्यक्रम बदलत असतात...त्याला वेळ तेवढाच 24 तास, मर्यादित असतो पण त्या तुलनेत साधण्याची उद्दिष्टे असंख्य असतात...ही सर्व प्राप्त करायची म्हटलं की प्रचंड ओढाताण आणि दमछाक होते...त्यामुळे प्रत्येकच माणसाला आणि प्रत्येकच कार्याला वेळ देणं खूपच अवघड आहे...सर्व गोष्टी, सर्वच माणसांना आपण Satisfy करू शकत नाही...नव्हे ते सर्व समाधानी होऊच शकत नाहीत...त्यामुळे स्वाभाविक प्रवाहात जगताना ओढाताण होऊ न देता सर्वोच्च प्राधान्यक्रमच फॉलो करावा...बाकी महत्वाच्या पण तुलनेने दुय्यम प्रधान्याच्या गोष्टी वेळेविना आणि मानवी मर्यादांमुळे बाजूला ठेवाव्या लागतात...
त्यामुळे आपल्याच प्रियजनांचा असा समज होणं साहजिक आहे की..."तू खूप बदलला आहेस, तू पहिल्यासारखा राहिला नाहीस इत्यादी इत्यादी..."...तसेतर त्यात प्रियजनांचा पण दोष नाही...त्यांचंही प्रेम असतंच आपल्यावर...फक्त ते आपल्या सद्यस्थिती आणि वास्तविक अक्षमतेला समजू शकत नाहीत हेच ते दुर्दैव...खरेतर कोणालाही दुखवायचं नसतं आपल्याला... सगळेच मला हवे असतात पण...वेळ आणि आवश्यक कार्यांच्या बंधनामुळे इच्छा असूनही ते शक्य होत नाही...सगळ्यांनाच भेटावं, सगळेच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात यशस्वी व्हावेत, खूष राहावेत असं वाटतं... आणि आपण कोणालाही विसरलेलो नसतो...एवढं प्रेम करणाऱ्या माणसांना मी कसं विसरु शकेल!
पण प्रत्येक ठिकाणी तितकीच प्रेमळ, जीव लावणारी असंख्य माणसं भेटत जातात. त्यामुळे पूर्वीच्या माणसांना देऊ शकणारा वेळ कमी होत जातो आणि पर्यायाने आपण खूप कमी लोकांच्या वाट्याला येतो...आणि नेहमीच बोललं पाहिजे, भेटलं पाहिजे एवढ्या फॉर्मलिटी पेक्षाही खूप व्यापक आपलं नातं आहे...जेव्हा म्हणून त्याला अवकाश देणं शक्य आहे तेव्हा आपण ते जपुया...आणि फक्त Formality पाळल्या नाहीत म्हणून दूर होऊ एवढं आपलं नातं कमजोर आहे का?
हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा...जिथंही असू, शक्य असेल तेव्हा भेटत राहूच...आणि जमिनीवरचं अंतर आपल्यात अंतर नाही आणू शकत...आपण सर्वच प्रियजन एकमेकांच्या मनात आहोत..."त्यांच्याकडून माझ्या अपेक्षापूर्ती पेक्षा, माझ्या प्रियजनांचे समाधानी, संतोषी जगणे आणि ते सगळे त्यांच्या प्राथमिक विश्वात खूष राहणं हे मी महत्वाचं समजतो"
बाकी मी त्यांना किंवा ते मला अवकाश(स्पेस) देऊ शकत नसतील तर त्यात वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नसावं...फक्त एकमेकांचं ओरिजिनल बिहेवीयर, स्वभाव बदलू नये..जीवनात केव्हाही प्रत्यक्ष भेटेल तेव्हा तो उत्साह,ती उस्फूर्तता, ते चैतन्य, जगण्यातली संपन्न उर्मी जिवंत भेटायला हवी... बस्स...
Happy Everyday...
शुभेच्छा...Love You All...😘 दोस्तांनो...काळजी घेऊयात...

#बोलावं वाटलं म्हणून बोललो...🤠

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

गांधी…

#Gandhi
#मजबुरी या मजबुती?
#प्रश्न आणि उकल

Read It...

~~"विचारांचा सामना विचारांनीच करने जेव्हा अशक्य होऊन बसते तेव्हा अशा विचारस्रोताचाच बळी घेतला जातो...कारण या राक्षसी,भ्याड मानसिकतेत सामना करण्याची तेवढी हिम्मतच नसते. आणि म्हणूनच अशा महामानवांचा नियोजनपूर्वक बळी घेतला जातो आणि मग या हत्यारयांचे अंध समर्थक सुद्धा लगेच तयार होतात. (विषाणूंसारखेे)~~
     
       हे महात्म्या तू या देशासाठी आयुष्य वेचले. का केले हे  सगळे? अजूनही आम्हाला तू समजलाच नाही. नव्हे आम्हीच तुला समजून घेतले नाही. तू एवढे महान कार्य केले ते विसरून आम्ही तुझ्या चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टीनाच लक्ष्य करतोय. त्याच गोष्टीना लक्ष्य करुन तुझ्यावर टिका केली जाते. टीकाही ठीक आहे. मतभेद असतील तर टिका होइलही. पण काही लोक(या लोकांना 'कुबेरपत्रांवरच' फक्त गांधी चालतो) जेव्हा तुझ्याविषयीच्या गैरसमजातून तुझ्यावर टोकाच्या द्वेषाने जहरी टिका करतात तेव्हा हृदय सुन्न होतं.टीका करा(टीका व्हायला हवी,अंधानुकरण अजिबात न करता जरूर प्रश्न विचारायला हवेत) पण काही लोक तुझा घोर अनादर करतात. तुझे कार्य आणि सदगुण घेणे सोडून तुझ्यावर टिका करण्यातच आमचा वेळ घालवतोय आम्ही.आमच्यापैकी बरेच इतरांना फक्त criticize करण्यातच धन्यता मानत आहेत(यापेक्षा जर सकारात्मक गोष्टींवर focus केले तर किती उत्तम! असो) तुही माणुसच होतास. काही गोष्टी तुही चुकला असशील. तुझ्याही जीवनात काही विरोधाभास जाणवत असतील. पण महात्मा म्हटल्यावर् त्याची एकही चूक क्षम्य नाही असाच आम्ही(व्यक्तिपूजक ?) समज करुन घेतलाय.

     तुझा अभ्यास न करताच आम्ही तुझ्यावर टिका करतो. तसा तुही समजायला कठिण आहेस आणी म्हणूनच की काय आम्ही तुझ्याविषयी जास्त विचार अणि अभ्यास न करता तुझ्या टिकाकारांनी केलेल्या लेखनावर विश्वास ठेवतो. (यामुळेच आम्ही आमच्या महापुरुषांतच भांडणे लावली आहेत). तू खरंच महात्मा आहेस का? तू वापरलेल्या अहिंसेच्या मार्गाने कुठे स्वातंत्र्य मिळते का? तू ब्रिटिशांचा agent होतास का? तुला राष्ट्रपिता म्हणावयास हवे का?. यांसारख्या प्रश्नावर चर्चा करण्यातच आम्ही आमचा वेळ खर्च करतोय.
(गांधींनी किंवा कोणत्याही महापुरुषाने हेच का केले किंवा हेच का नाही केले असा प्रश्न कधीच, काहीही ना केलेली माणसे विचारतात तेव्हा वाईट वाटते)

एका मानसशास्त्रीय तत्वानुसार जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आकलनापलिकडे आणि क्षमतेच्या बाहेर असते तेव्हा त्या गोष्टीचा माणूस द्वेष अन टीका करू लागतो.
       आणि हे तुपण म्हणत नाहीस की फ़क्त माझ्यामुळेच स्वातंत्र्य मिळाले.तर सर्व देशभक्तांच्या समर्पणाने ते मिळाले आहे हेे तुही मान्य करतोस. स्वातंत्र्यानंतर कोणत्याही राजकीय पदाचा मोह या माणसाने ठेवला नाही हे लक्षात घ्यायला हवे. माझ्या देशबांधवांना कपडे मिळत नाहीत म्हणून गांधींनी आयुष्यभर फक्त गरजेपुरते कपडे घातले. अगदी सुभाषचंद्रानीच तुला पहिल्यांदा राष्ट्रपित्या  हे सम्बोधन वापरले...भगतसिंहानी 'मी नास्तिक का आहे' या लेखात तुझा महात्माजी असा उल्लेख केला आहे...आणि आम्ही भगतसिंह, सुभाषचंद्र, सावरकर याना तुझ्या विरोधात बसवतो. त्यांनाही तुझ्याविषयी आणि तुलाही त्यांच्याविषयी आदर होताच. पण त्यांचा आणि तुझा मार्ग वेगळा होता. प्रसंगी त्यानी तुझ्यावर आणि तू त्यांच्यावर टीकाही केलिस.....पण कींचितही अनादर नव्हता तर फ़क्त वैचारिक मतभेद होते.

*गांधी-सावरकर:-सावरकरांना मानणाऱ्या काही लोकांनी गांधीहत्या केली पण म्हणून त्यात सावरकरांना दोषी ठरवता येत नाही. सावरकरांसारखा योध्दा माणूस असे भ्याड कृत्य करेल असे व्यक्तिशः मला वाटत नाही(पण असेही वाचले आहे की न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले आहे पण तपासही पुरेसा झाला नव्हता म्हणजे तपास यंत्रणा कमी पडली होती असेही मी वाचले आहे.त्यामुळं लगेच निष्कर्ष काढता येणार नाही)
आणि एका ठिकाणी स्वतः सावरकरांनी म्हटले आहे की मला सर्वात जवळचा माणूस गांधी वाटतो.

*गांधी-सुभाषचंद्र:- मतभेद होते पण मनभेद नव्हते. नेताजींनीच सर्वप्रथम गांधीजींना आझाद हिंद रेडिओवरून राष्ट्रपित्या म्हणून संबोधले होते.एवढेच काय आझाद हिंद सेनेच्या एका ब्रिगेडचे नाव सुभाषचंद्रांनी 'गांधी ब्रिगेड' ठेवले होते. चले जाव चळवळ सुरू झाली तेव्हा नेताजी बोलले होते, की आज मी बापूंसोबत पाहिजे होतो(@बर्लिन)

*गांधी- बाबासाहेब(आपल्यासाठी हेच खरे साहेब आहेत):-

गांधीजी आधी राजकीय स्वातंत्र्य अन राजकीय सुधारणा साठी प्रयत्नशील होते. तेच त्यांचे प्राधान्य होते. आणि बाबासाहेबाना आधी सामाजिक सुधारणा हव्या होत्या. दोघांच्याही प्राधान्यक्रम वेगळे होते. आणि गांधींनी स्वतः नियम केला होता, जर आंतरजातीय विवाह असेल आणि त्यातील एक दलित असेल तरच मी तिथे जाईन. आणि गांधीजी चळवळीसोबतच अस्पृश्यता विरोधी काम करत होते. मान्य आहे की चळवळीला त्यांनी जेवढा वेळ दिला तेवढा त्यांना दलितांसाठी देता आला नाही. उलट बाबासाहेबांचे प्राधान्य चळवळीला नव्हते तर अस्पृश्यता विरोधी होते. म्हणून त्यांना त्यासाठी जास्त वेळ देता आला. आणि म्हणून, त्यांना हरीजनासाठी काहीच नाही केले, ते हरीजनांसाठी दांभिक होते असे म्हणजे मला चुकीचे वाटते

गांधींनीच स्वातंत्र्यानंतर संविधान सभेसाठी बाबासाहेबांचे नाव काँग्रेस ला सुचवले होते. दलित बंधूंना हरिजन म्हणजे हरीचे-ईश्वराचे लोक असे गांधीजी म्हणत. हरिजन हे वृत्तपत्रदेखील ते चालवायचे. डॉक्टर बाबासाहेब आणि गांधीजी यांच्यात वैचारिक मतभेद आणि मार्ग भिन्न होते पण ते दोघेही एकमेकांचा प्रचंड आदर करत होते.
काही लोक म्हणतात की गांधींनी आंबेडकरांना छळले...पण डॉक्टरांना पुणे कराराचा निर्णय मान्य नव्हता. त्यांना हिंदूंपासून पूर्णतः वेगळ्या जागा हव्या होत्या.
इथे बाबासाहेबाना तो निर्णय मान्य नव्हता म्हणून त्याना छळले असे होऊ शकत नाही असे मला वाटते.

**उपवास--यात स्वतःला त्रास करून घेणे असते. यात दुसऱ्याची मानसिक कुचंबना कुठे होते?
उलट संवेदनशील माणसाचे मतपरिवर्तन करण्याचा तो एक मार्ग आहे. आणि समोरच्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात येते तेव्हा अपराधीपणा वाटणे मनुष्यस्वभाव आहे. यात उपोषनकर्त्याने कुचंबणा नाही केली तर उलट समोरच्या व्यक्तीला बदलास प्रवृत्त केले.

*ब्रम्हचर्य--गांधीजींचे ब्रह्मचर्य हे त्यांनी एकट्याने ठरवले नव्हते तर पतिपत्नी दोघांनी पूर्ण विचारांती एकमेकांच्या मान्यतेने स्वीकारले होते. तो एकतर्फी निर्णय नव्हता.

*प्रार्थना--यात कोणालाही खिजवण्याचा हेतू असूच शकत नाही. तो, ज्याचा त्याचा स्वयंभू निर्णय असतो. ती काही कोणावर लादली जात नाही. उलट विरोधकांबद्दलसुद्धा चांगली भावना निर्माण होण्याचे सामर्थ्य यावे हा हेतू असतो.

आणि स्वतःच्या हक्कांसाठी किंवा परिवर्तनासाठी लढताना अहिंसा वापरताना, कोणालाही खिजवणे किंवा घाबरवणे हा हेतू नसतो. उलट जर असे वाटत असेल तर त्यात प्रतिपक्षाचा कोतेपणा किंवा असमर्थता दिसून येते. आणि समोरच्याला चूक निदर्शनास आणून देणे हा अंतस्थ हेतू असतो.

प्रार्थनेचा आग्रह...तो ऐच्छिक आणि वयक्तिक होता. अनिवार्य नव्हता.
आणि secular म्हणजे स्वतःची धर्मश्रद्धा मानून इतरांचा आदर करणे.

आणि प्रार्थनेचा उद्देश काय होता?
फक्त लोकांना एकत्र आणणे आणि शत्रूबद्दल सुद्धा चांगळू भावना निर्माण होऊन मनोबल वाढवण्यासाठी. जेणेकरून अहिंसेसठी लोक मानसिकरित्या तयार होतील.
यात कसला आलाय सनातनीना?

*55 कोटी:- नैतिकता आणि दिलेला शब्द व केलेला करार पाळणे हे महत्वाचे होते तसेच भविष्यात वाद नको आणि आंतराष्ट्रीय पातळीवर आपली बाजू स्वच्छ राहण्यासाठी गांधीजी पाकला 55 कोटी द्यावे यावर ठाम होते. आणि आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण कोणाची उधारी नाही ठेवत.(हा आपला मोठेपणा आहे)
आणि आपल्या देशात शांतता हवी असेल तर शेजारच्या देशात शांतता असणे आवश्यक असते. आणि गांधीजींनी 55 कोटी द्यावेत असा आग्रह धरला पण उपोषण त्यासाठी नाही केले तर सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी केले होते.

*गांधी-भगतसिंह:-  भागातसिंहांची फाशी माफ व्हावी म्हणून स्वतः गांधी आयर्विन यांना भेटले होते. पण ब्रिटिशांनी चळवळ खच्ची करण्यासाठी नियोजित वेळेअगोदर त्यांना फाशी दिली. ईथे ब्रिटिशांनी गांधींजिंच ऐकलं नाही. पण फाशीसाठी लोक गांधीलाच का दोष देतात?

*अहिंसा-- गांधीजींची अहिंसा ही Absolute किंवा अतिताठर नव्हती. तर ती हृदयपरिवर्तनावर आधारित होती. आणि आवश्यक व अपरिहार्य स्थितीत त्यांनी हिंसेचे समर्थन केले आहे. उदा- पाकविरुद्ध काश्मिरात लष्कर पाठवायला त्यांनी समर्थन दिले होते. गांधी म्हणायचे..."भित्रेपणा, लाचारपणा आणि हिंसा यातली निवड करायला सांगितली तर मग हिंसा करा असे मी म्हणेन पण भित्रेपणा नाही"

आणि गांधीजींनी सगळ्यात आधी अहिंसेचा प्रयोग आफ्रिकेत करून पाहिला. तो यशस्वी झाल्यावरच भारतात त्यांनी त्याचा अवलंब केला.
आणि भारतीय समाजमनाची नाडी त्यांनी ओळखली होती. आपण नेहमी सुरक्षित आणि कमी धोक्याचा मार्ग चोखाळतो. आणि हाच सुरक्षित असा सत्याग्रहाचा मार्ग गांधीजींनी भारताला दिला. त्यावेळच्या 30 कोटी जनतेला तो योग्य वाटला आणि ती गांधींसोबत गेली. मग हे 30 कोटी लोक वेडे होते का?
खुद्द भगतसिंह त्यांच्या अखेरच्या दिवसात बोलले होते. की आमच्या हिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळणे अवघड वाटत आहे. कदाचित दुसरा मार्ग अवलंबावा लागेल.
आणि महात्मा गौतम बुद्धाचा शांती आणि अहिंसेचा वारसा आपण अभिमानाने सांगतो पण तेच सांगणाऱ्या आणि जगणाऱ्या गांधीला मात्र आमचे लोक दोष ठेवतात.

गांधीजी कधीच त्यांच्या गोष्टी कोणावर लादत नव्हते. आणि पूर्वीच्याच मतावर आग्रही न राहता...ते बोलले होते- माझ्या 2 मतांत विरोधाभास आढळला तर माझे 2 रे विधान बरोबर मानावे.

     खरेतर अहिंसक व्यक्ती आपल्या हक्कांसाठी लढत असतो. आणि समोरचा त्याच्या प्रवृत्तीनुसार हिंसा करतो. त्याला हिंसा करण्यास प्रवृत्त करत नाही...आणि हक्क मिळवणे म्हणजे राजकीय फायदा मिळवणे असं कसं म्हणता येईल??

*गांधीहत्या-- जेव्हा हत्याऱ्यांना हिरो बनवले जाते तेव्हा ते अधोगतीचे लक्षण असते. गांधीहत्या करणार्यांनी काय साध्य केले? त्यांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान काय? आणि गांधीहत्येचे समर्थन करणारे जे फाळणीचे कारण सांगतात...ती फाळणी टाळण्यासाठी या लोकांनी काय प्रयत्न केले होते?
आणि 1935 दरम्यान जेव्हा फाळणीचा गंधही नव्हता तेव्हा याच हत्यार्यांनी गांधीहत्येचा प्रयत्न का केला होता?
आणि जर एवढीच फाळणीची चाड होती तर मग फाळणीचे खरे खलनायक जिनांना तो न्याय का लावला नाही? तर मग फाळणीचा प्रश्नच मिटला असता ना....!
    
(*काही लोक जाणीवपूर्वक 'गांधीवध हा शब्द वापरतात.त्यांनी हे लक्षात घ्यावे कि 'वध' वाईट गोष्टींचा करतात चांगल्या नाही.
हि हत्या होती,वध नाही.)

      आईनस्टाइन ,जॉर्ज बर्नार्ड शॉ, नेल्सन मंडेला, मार्टिन लूथर किंग, मार्क ट्वेन, होची मिन्ह, दलाई लामा,जयप्रकाश नारायण, बाबा आमटे, यांसारख्या अगदी थोर महापुरुषांनी देखील तुझा गौरव केलाय. आंग सान स्यू कि, बराक ओबामा आणि अण्णासुद्धा तुला हिरो मानतात. याचाच अर्थ तू खुप महान आहे. पण तूझी महानता समजून घेण्यात आम्ही कमी पड़तोय....तुझी तत्वे apply करण्यास अवघड असल्याने आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करतो. माझ्या मित्रांना एवढेच आवाहन आहे की. कृपया तुमचे गांधीजीशी किंवा कोणत्याही महामानवाशी मतभेद असतील तर जरूर असुद्या पण जगाने गौरवलेला तो एक महात्मा आहे. आणी आपण अजुन तर तेवढे प्रगल्भ झालो आहोत का ? की एवढ्या लवकर निष्कर्ष काढू. तर मित्रांनो मतभेद असुद्या पण टोकाचा अनादर करू नका. अगोदर गांधीचा(कोणत्याही महापुरुषांचा)  स्वतः अभ्यास करा अणि मगच ठरवा.
"Either you are with Gandhi or against Gandhi, but you can't ignore Gandhi"

     भारताबाहेर मार्टिन लूथर किंग, नेल्सन मंडेला, आंग सान स्यू कि आणि अनेकांनी गांधीचा मार्ग अवलंबला आणि त्याना यशही मिळाले. हे सत्य आहे. आज आम्हाला जास्त थांबता येत नाही, आम्हाला Instant Result हवे असतात आणि गांधीवाद Apply करायला अवघड पण आहे. म्हणूनच आम्ही तिकडे पाठ फिरवतो....गांधी Instant नाही पण Constant Result नक्कीच देतो.

     फाळणीच्या तर गांधी विरोधात होते. पण त्यांच्या अनुपस्थितित कांग्रेसला त्यांच्या इच्छेविरुद्ध तो ठराव पास करावा लागला. माझ्या देहाची अगोदर वाटणी करा आणि मग देशाची, हे गांधीजी उद्गारले होते.
      काही विरोधाभासही असतील  पण तुही एक माणूस होता आणि तुही चुकु शकतोस हे आम्ही समजून घेतले पाहिजे.पण महात्मा म्हणून त्याची कोणतीच चूक क्षम्य नाही असा आम्ही समज करून घेतलाय.(चुका केल्या हे सांगत नाहीये फक्त आम्ही काय चूक करतो ते सांगतोय.)

आणि सर्वात शेवटी, अल्बर्ट आइनस्टाइन यांचे वाक्य आठवते,
"Generations to come, it may be, will scarce believe that such one as this ever in flesh and blood walked upon the earth"
" येणाऱ्या पिढयांना, कदाचित, विश्वास ठेवणे कठीण होईल की असा एक रक्तामांसाचा माणूस पृथ्वीवर होऊन गेला"

आणि अगदी खरंय हे!

*नम्र विनंती-कृपया मी कोणताही "----वादी" नाही.माझ्या अल्पमतीनुसार जे योग्य वाटले ते मांडले आहे.त्यामुळे गांधीवादी आहेका? असा वरकरणी भोळा प्रश्न विचारू नये...मी कोणत्याच विशिष्ट चौकटीत बसत नाही...म्हणजे कोणालाच विशिष्ट चौकटीत बसवणं चुकीचं आहे.

*कळकळीची विनंती-- काही क्षुद्र लोक त्यांच्या राजकीय, धार्मिक किंवा प्रसिद्धी स्वार्थासाठी दिशाभूल करत असतात.अशा अपप्रचाराला, व्याख्याने-कीर्तने-पुस्तके यांना बळी न पडता आपण स्वतः अभ्यास करून तर्क आणि विवेकाधारे निष्कर्ष काढावा.
--चि. दयानंद माने

#मागील वर्षीचीच पोस्ट पुन्हा...

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...