सोमवार, ९ डिसेंबर, २०१९

#आपल्या लिहिण्या बोलण्याचा उद्देश,कारण काय?

       मनातलं मेंदूमंथनातून आलेलं बरंवाईट बाहेर टाकणं, ते ओझं रिकामे करणे एवढंच  की बाकी कोणतातरी उद्देश असतो?? 
    आपल्या कोणत्याही प्रकारे व्यक्त होण्याचे पुढे काय परिणाम होतील किंवा नाही याचा विचार फारसा करू नये.थोडक्यात काही बाबतीतले बोलणे किंवा लिहिणे हे निर्माल्य पाण्यात सोडल्यासारखं सोडून द्यायचं असतं. प्रतिक्रियांचं ओझं घ्यायचं नसतं. आपली मानसिक, वैचारिक, स्वाभाविक गरज व व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू म्हणून स्वतःसाठीच बोलायचं, व्यक्त व्हायचं असतं. आपली मानसिक गरज आणि मेंदूत उपजत असणारी जिज्ञासा, कुतूहल(Curiosity) आणि मग त्यातून आपल्या अंतरंगात होणारी खलबते आणि त्यातून बाहेर पडणारे काहीतरी उत्पादन आणि कोणत्याच गोष्टीकडे कायम न्यूट्रल राहून शांत राहू न शकण्याची कदाचित आपली मूलभूत वृत्ती हे सगळं करण्यास आपल्याला प्रवृत्त करत असावी...आजूबाजूच्या घडणाऱ्या सगळ्या गोष्टींना काहीतरी प्रमाणात आणि कोणत्यातरी स्वरूपात प्रतिसाद देण्याची एक नैसर्गिक प्रेरणा आपल्यात असते आणि यातूनच मग आजूबाजूच्या आपल्या Sphere of Influence ला आपण आपल्या लिहिण्या,बोलण्या-वागण्यातून व्यक्त होत प्रतिसाद देत असतो...थोडक्यात आपल्या एकांकिकेची किंवा अनेकांकीतली आपल्या वाट्याला आलेली भूमिका कमीअधिक प्रमाणात आपण वठवत असतो आणि आजूबाजूच्या Sphere of Influence मधून किंवा बाह्यवर्तुळातून येणारे प्रतिसाद, प्रतिक्रिया, होणारे परिणाम ह्याचा फारसा परिणाम पुन्हा आपल्यावर होत असतो जो किती प्रमाणात करून घ्यायचा किंवा नाही घ्यायचा ते ज्यांचं त्यानं ठरवायचं असतं...And कदाचित that's it all...😃
बरोबर??
---✍ दया

रविवार, ८ डिसेंबर, २०१९

#जडणघडण-धारणा व संस्कार

        आपल्या बेसिकमध्येच लै मोठा लोचा हाय. अगदी नेणत्या वयापासून जाणतं होईपर्यंत जडणघडणच चुकीच्या धारणांवर होते. हे असं असतं, ते तसं असतं असं चुकीचं, अर्धवट शिकवल्यामुळे आपल्यातल्या बऱ्याच जणांचं बेसिक शेवटच्या श्वासापर्यंत कच्चंच राहतं...० ते ६ घरात कुटुंबीय आणि पाहुण्यांद्वारे मुलगा किंवा मुलगी म्हणून होणारे संस्कार आणि घडवले जाणारे बालमन, ६ ते १८ पर्यंत कुटुंबीय आणि भोवतालचे मोठे(वयाने) लोकं यांच्याकडून घडवले जाणारे किशोरमन आणि मग पुन्हा शालेय अभ्यासक्रमातील त्रुटी, आणि आपल्या समाजातील रचनात्मक लोचे, इंटरनेट ह्यांनी बरोबर मुलगा किंवा मुलगी यांची स्त्री-पुरुष म्हणून मानसिकता घडवली जाते...आणि ते बरोबरच आहे हे आपण मेंदूत घट्ट धरून बसतो. आणि डोळे उघडे व मेंदू जाग्यावर ठेऊन तर्क-विज्ञानाच्या निकषांवर ते पडताळून बघत नाही आणि मग अनिष्ट घडत जातं आणि आपण फक्त न्यायालय, व्यवस्था,पोलीस, प्रशासन,आणि ज्यांच्यावर अन्याय घडला त्या पीडितांना दोषी ठरवून मोकळे होतो...पण आपल्या बेसिक्समधले कच्चे दुवे, फालतू धारणा यांना दूषण लावून ते बदलण्याकामी लक्ष देत नाही...
#आत्मपरीक्षण
#मानसिकता
-✍चि.दयानंद

शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

#डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स, इंडिया

     जिथं कोणताही राजकीय हस्तक्षेप नसेल किंवा अत्यंत मर्यादित,कमी Political Interference असेल अशा वातावरणात सर्व्हिस,नोकरी, व्यवसाय करायला मिळणं ही सध्या खूप लोकांची इच्छा आणि गरज आहे.राजकीय हितसंबंध,हस्तक्षेप, बेकायदेशीर-नियमबाह्य कामांचे लागेबांधे आणि टेबलाखालून, टेबलावरून होणारे पद्धतशीर व्यवहार आणि त्यातून स्वतःला अलग ठेवण्यास आणले जाणारे अडथळे आणि मोकळेपणे काम करण्यास होणारे सततचे अटकाव हे सगळं मनःस्थितिला आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या इच्छेला सुरुंग लावायला लागतं आणि आर्थिक हितसंबंध टाळता येणंसुदधा अवघड आहे सोबतच नियमबाह्य कामांचा तगादा,हितसंबंधी लोकांची नाराजी,त्यातून उदभवणारा मानसिक,आर्थिक,कायदेशीर जाच-मनस्ताप,असुरक्षितता हे सगळं टाळता येईल असं क्षेत्र कधीही चांगलं.
    काही उणिवा असल्या तरी चालेल पण अनैच्छिक मिंधेपणा आणि बाह्य वर्चस्व यामुळं तुटलेपणाची भावना निर्माण होणार नाही  आणि आपल्याला काम करायला मोकळं अवकाश मिळणं हीच मोठी उपलब्धी असेल असं एखादं क्षेत्र असावं...
एकवेळ या सगळ्या कटकटीतून मुक्त असलेलं आणि आजघडीलातरी कामासाठी बहुतांशी स्वच्छ अवकाश   असणारे आणि बाह्य घटकांचा अजिबात त्रास नसणारे रेल्वे-पोस्ट्स-अशी केंद्रीय डिपार्टमेंट्स कधीही उत्तम वाटतात...
        असं कालच एका राज्य सरकारच्या अधिकारी व्यक्तीसोबत बोलताना त्यांनी वरील मत माझ्यासोबत शेअर केलं...👆🏻
--चि. दयानंद
जय डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स, इंडिया🤩🤩✌🏻✌🏻

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

◆गुन्हे व शिक्षा-मानसिकता व आत्मपरीक्षण

#फाशी/देहदंड
#गुन्हे आणि शिक्षा
#मानसिकता-आत्मपरीक्षण
   
      खरेतर गुन्हेगाराला शिक्षा ही व्हायलाच हवी. त्यामुळं गुन्हेगारांना जरब बसते. फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा ही Rarest of Rare Cases मधेच Implement केली जाते. खालच्या कोर्टाने जरी देहदंडाची शिक्षा सुनावली तरी अपिलात बऱ्याच वेळा ती शिक्षा नाहीशी होऊन सौम्य शिक्षा होते.
आणि जर गुन्हेगाराची परिस्थिती खरंच सुधारण्यासारखी असेल तर त्याला राष्ट्रपतींद्वारे माफीची व्यवस्था सुद्धा केली आहे. पण काही वेळा असेही झाले आहे की शिक्षा सौम्य झाल्यानन्तर शिक्षा भोगून झाल्यावर त्याच गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. आणि गंभीर गुन्हेगार मोकाट सुटले तर समाजातसुद्धा दहशतीचे वातावरण राहते. त्यामुळे आयुष्यभर सश्रम कारावास किंवा दुर्मिळ केसमध्ये फाशी ही व्हायलाच पाहिजे. मान्य आहे फाशी दिल्यामुळे गुन्हे संपणार नाहीत पण शिक्षेच्या भीतीने गुन्ह्याचे प्रमाण निश्चितच कमी होईल.
        बऱ्याच वेळा फाशी जाहीर झाल्यावर लोक आनंदाने नाचतात, पेढे वाटतात. पीडित व्यक्तीला न्याय मिळाला याचा जर हा आनंद असेल तर ठीक आहे पण गुन्हेगाराला जाहीर चौकात फोडून काढा, हे कापा ते कापा असे म्हणणे म्हणजे आपल्यातील सुप्त राग आणि विचित्रपणा व्यक्त करणे होय. लोकांच्या मनातील भावना आपण समजू शकतो. पण अशा गोष्टीतून, अशा मत व्यक्त करण्यातून आपण माणूस म्हणून किती हीन आणि खालचा विचार करतो हे जाणवते. आणि गुन्हेगाराला फाशी झाल्यामुळे आणि त्याच्या नीच कृत्यामुळे त्याच्यासुद्धा कुटुंबाची नंतर फरफट होत असते आणि गेलेला जीव किंवा झालेली हानीसुद्धा भरून येत नसते.
फक्त गुन्हेगाराला शिक्षा झाली याचा आनन्द न मानता पीडित व्यक्तीला न्याय मिळाला याचा आनन्द मानला पाहिजे. इथं दोन दृष्टीकोणात अगदी सूक्ष्म फरक आहे पण हा फरक महत्वाचा आहे.गुन्हेगाराला शिक्षा झाल्यावर किंवा गुन्हा घडल्यावर ज्या तावातावात ही शिक्षा द्यावी, ती शिक्षा द्यावी हे आपण बोलतो त्याच उत्साहात आपण स्वतः कुठे अशाच प्रकारचा कमी तीव्रतेच्या गुन्हा करत तर नाही ना?
आपले कुठे चुकत आहे का?
आपण स्वतः नक्की समाजात विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत कसे वागत आहोत?
आपण पण त्यांच्यावर कळत नकळत अन्याय तर करत नाही ना?
आपली मूल्यव्यवस्था कुठे चुकत आहे?
हा विचार करायला हवा.
     शिक्षा जाहीर झाल्यावर न्यायव्यवस्थेच्या त्या निर्णयाचा आदर करायला हवा पण फाशीची किंवा देहदंडाची शिक्षा जर लोक आनंदाने celebrate करत असतील तर ते सुशिक्षित समाजाचे लक्षण नक्कीच नाही. शिक्षेचा उद्देश हा काही बदला घेणे हा नसतो तर गुन्हेगारात बदल व्हावा आणि पुन्हा अशा गोष्टी घडण्यास पायबंद व्हावा हा असतो.
काही लोक जेव्हा शिक्षा झाल्यानन्तर ज्या राक्षसी पद्धतीने आनंद व्यक्त करतात त्यातून हे दिसून येते की या गुन्ह्याने ज्यांचे घर जळाले आहे त्यांचे दुःख लोकांना समजलंच नाही.त्यांच्या दुःखाचे गांभीर्य विसरून आपण आपल्या मनातील सुप्त रागाचे समाधान करून घेत असतो. जर का जळाळेले घर, झालेला अन्याय दुरुस्त होणार असेल तर नक्कीच आनंद व्यक्त करूया.
माजुरा आनंद साजरा करण्यापेक्षा आपल्यातली क्रूरता, आपल्यातला निचपणा संपवावा आणि आनंद साजरा करावा.
        आपल्या बोलण्याने, नजरेने, कोणाकडे बघण्याने, वागण्याने जर कोणाही व्यक्तीला असुरक्षित वाटणार नाही,त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला जमल्यावर आनंद व्यक्त करूया.अशा घटनांतून आपण यापुढे असे काही होणार नाही यासाठीची जाणीव रुजवायचा प्रयत्न करायला हवा.
    आणि   गुन्हा करताना माणूस विचारच करत नाही म्हणून तर गुन्हा घडतो कारण त्यावेळी त्याचा मेंदू ठिकाणावर नसतोच आणि त्यावेळी तो मेंदू विचार करण्यास प्रवृत्त व्हावा यासाठी आपण स्वतःवर आणि आपल्या मुलांवर तसे मूल्यसंस्कार रुजवणे अत्यंत महत्वाचे आहे.यातूनच एक विवेकी, शहाणपणाने वागायची मानसिकता घडत जाईल...बस्स आपण स्वतः आणि आपली मुले वैयक्तिक पातळीवर 'माणूस' म्हणून वागली तरी खूप झालं...बाकी कायदा,व्यवस्था त्यांचं काम करेलच...कारण आपणच सामूहिकरीत्या कायदा आणि व्यवस्था आहोत...

#वि.सूचना: कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याला, अन्यायाला विरोधच आहे आणि तो असावाच. इथे फक्त विरोध,प्रतिकार व निवारण करताना एक नागरिक, एक समाज म्हणून आपण कशी दुटप्पी, असंस्कृत, भूमिका घेतो आणि अन्याय निवारण करण्यासाठी आपणच निर्माण केलेल्या कायदा,न्यायालय, पोलीस, प्रशासन आणि मूल्यशिक्षण या गोष्टींना आणखी मजबूत, सुधारित करण्याऐवजी त्यांनाच आपण कसे पायदळी तुडवतो हे सांगायचं आहे.

--✍ चि. दया
06 डिसें 2019

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...