सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

#दीपावली

जीवनात अनिश्चितता(Uncertainty) खूप आहे.अलीकडे तर ती खूपच वाढत आहे.उद्या काय आणि कसे होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे.अगदी आज सायंकाळपर्यंत काय होईल ते सांगता येत नाही.तरीही आपण सगळं व्यवस्थित होईल;काही नीट नाहीच झालं तर त्यातून निभावण्याचं,सावरण्याचं बळ तरी येईल या आशेने जगायचं असतं.वाईट वाटतं,संताप येतो,टेन्शन येतं,पण तेही काही मिनिटे,काही तास झालं की विसरुन जायचं असतं.कारण आपल्या हाताबाहेरच्या गोष्टीत टेन्शन घेऊन काय उपयोग होणार आहे? कित्येक गोष्टीत आपण काहीच बदल करू शकत नाही.अगदी पालापाचोळा असल्यासारखे गोष्टी घडताना नुसते बघत राहावे लागते.पण जगायचं तर आहे,मग फालतू जगायचं का?रोज टेन्शन घेत जगायचं का? तर मुळीच नाही.कालच्या वाईट दिवसासाठी आजचा नवीन दिवस खराब करायचा नसतो. काही मिनिटे,तास झाले कि अंधार,दुःख विसरून दिव्यांच्या उजेडात दिमाखात जगायचं असतं.हीच दीपावली(दिवाळी) असते.#दयाआनंद😊

बुधवार, १९ मे, २०२१

#भावकी आणि भाऊबंदकी...

आज ऑफिसमध्ये आलेला अनुभूव...
भावकी आणि भाऊबंदकी...लै अवघड आहे राव.😥
आई मेली त्याचं दुःख नाही,उलट दुसऱ्याच दिवशी एकजण माझ्याकडे आला आणि म्हणाला.आई वारली आहे तर तिच्या पैशाला जो कायदेशीर नॉमिनी(वारसदार) आहे त्याला अजिबात पैसे देऊ नका;मी त्याला खूप समजावून सांगितलं कि तुम्ही उगाच ह्यात वेळ आणि पैसे,व्यर्थ घालवू नका,उलट सगळे भाऊ एकत्र बसून पैसे वाटून घ्या तरच तुमचा फायदा आहे नाहीतर तुम्हाला एक पैसाही मिळणार नाही आणि ह्यात आमचाही वेळ घालवू नका. उलट तो मला म्हणाला उद्याच वकीलाकडे जातो आणि कोर्टातून सगळ्या प्रॉपर्टीवर स्टे आणतो.माझे पैसे गेले तरी चालतील पण मी ज्याचा कायदेशीर हक्क आहे त्या भावाला पैसे मिळू देणार नाही.इतके वाईट आणि स्वार्थी, खुनशी भाऊबंद आहेत आपल्याकडे.लै अवघड आहे हो.नवरा मेला तरी चालेल पण सवत ----की(विधवा) झाली पाहिजे अशी मराठीत म्हण आहे ते खरे आहे.सगळं विकेन पण सख्ख्या भावाची जीरवणारच हे मला त्याने सांगितलं.धन्य ते बंधुप्रेम.आई मेल्याचं दुःख नाही फक्त तिच्या पैशावर डोळा.राम-लक्ष्मण-भरत यांच्या बंधुप्रेमाला पण आज लाज वाटली असेल.एकही कुटुंब,घर असे नसेल जिथे भाऊ-भाऊ-बहीण ह्यांचं नीट प्रेमाने जमत असेल.उलट सगळीकडे संपत्तीचे आणि इतर विवाद कोर्टात चालू आहेत.रोज कोर्टाच्या हजारो नोटिसा एकाच कुटुंबातल्या लोकांना आलेल्या आम्ही बघतो.Succession साठीचे हे विवाद कधी संपतील आणि भावा-भावा-बहिणीत प्रेम अखंड राहील तो दिवस कधी उजडेल?🤔
असो...आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर तरी संपत्ती,पैशासाठी आपलं कुटुंब,आपलं नातं, प्रेम ह्यात दुरावा येणार नाही याची काळजी घ्यावी एवढंच आपल्या हातात आहे.

रविवार, ९ मे, २०२१

# मी कोणाचा चहा पीत नाही कारण....कारण आहे,# एका अयोग्य,अपात्र चहाचे पुराण...😄

       तर आपण ज्या ठिकाणी,ज्या स्थानी-पदावर आहोत त्यामुळं जर आपल्याला कोणी काही देऊ करत असेल तर म्हणजे अगदी चहापाणी,एखादी वस्तू वगैरे तर ते घेऊ नये.कारण आपण आपलं कर्तव्य करत असतो आणि काही फार विशेष वगैरे करत नसतो.पण ते केलं तर समोरच्या व्यक्तीचे काम चांगले झाले किंवा लवकर झाले, वेळ-त्रास वाचला म्हणून तो माणूस धन्यवाद देतो आणि स्वखुशीने आपल्याला चहापाणी किंवा इतर काही देऊ करत असेल तर आपण प्रांजळपणाने, नम्रपणे त्याला नकार दिला पाहिजे.त्याचे धन्यवाद स्वीकारावेत पण चहाला अजिबात 'होय' म्हणायचं नाही.कारण एक पहिला चहा नंतर आपल्याला आणि लोकांनासुद्धा चुकीची सवय लावतो.आणि त्या चहाचं ओझं खूप असतं जे आपल्याला आयुष्यभर चटक लावू शकतं आणि आपण त्यात वाकून जाऊ शकतो.आपल्याला खुष करण्यासाठी किंवा कधीकधी आपल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी समोरची व्यक्ती आपल्याला चहा देऊ करते पण आपल्यावर त्याचं कर्ज, ओझं राहतं आणि आपण त्यांचे मिंधे होतो ज्याचा लोकसुद्धा हिशोब ठेवतात. एकदा चहा घेतल्यानंतर आपण परखडपणे आणि निर्भय होऊन, नियमाशी बांधील राहुन काम करण्यास अडचण होऊ शकते.आपल्यावर त्या माणसाच्या चहाचे कर्ज असल्याने आपण नियमबाह्य काम करून देण्याची, थोडं चुकीचं वागण्याची शक्यता वाढते. थोडक्यातआपला मार्ग चुकू शकतो.त्यामुळं शक्यतो आपल्या नोकरीच्या ठिकाणी, सर्व्हिसमुळं मिळणाऱ्या 'चहा'ला नम्रपणे नाही म्हणावे;किमान त्या ठिकाणी तरी. फक्त त्यांचं काम केलं किंवा करावं म्हणून दिलं तर त्या पवित्र ठिकाणी तरी कोणाकडून काही स्वीकारू नये.मी तर कोणी प्रेमानं, धन्यवाद म्हणून जरी चहा घ्या म्हणाले तरी ऑफिसमध्ये कामानिमित्त येणाऱ्या लोकांकडून चहा घ्यायला नेहमी नकार देतो.उलट मीच तुम्हाला चहा पाजतो पण प्लिज आज इथं तुमचा चहा नको! आपण नंतर कधीतरी चहा घेऊ असे म्हणून ते टाळतो. उलट त्यांना म्हणतो की बाहेर कधी आपली सहज भेट झाली तर स्नेह,माणुसकी म्हणून आपण चहा नक्की घेऊया.पण फक्त इथं ऑफिसमध्ये आणि 'कामा'च्या कारणामुळे तो नको.ह्यामुळे एक होतं कि,आपल्याला आपण कोणाचे मिंधे आहोत असा फील येत नाही.आपण नम्रपणे,ताठ बाण्याने काम करू शकतो.आपल्या कष्टापेक्षा जास्त मोबदला आपण विनाकारण घेतला ह्याचाही त्रास होत नाही.एक चहा आपला मार्ग भरकटवू शकतो.त्यामुळं आपले पद-काम-नोकरी मुळं जे मिळतंय त्याला नम्रपणे नाही म्हणावे.पण त्या व्यक्तीची बाहेर कुठे भेट झाली तर ओळख-स्नेह-मैत्री म्हणून फक्त चहा घेण्यास हरकत नाही-त्याचेसुद्धा बिल पहिल्या वेळेस आपण स्वतः दिलेले उत्तम.पण कार्यालयात,कामामुळे घेतलेला 'चहा' आपला स्वाभिमान, आपला आत्मसन्मान, आपला ताठ बाणेदारपणा,इमानदारी ह्यांना 'अश्व' लावू शकतो.कारण एकदा सवय लागली माणूस सारखं काहीतरी फुकट मिळेल यासाठी सोकावतो.इथूनच लाचखोरी, मोहमाया,अफरातफरीची सुरुवात होते.आपल्याला पगार मिळतो तोच पोटभर,भरपूर-पुरेपूर असतो.ते सोडून लोकांकडून काही घेणं,तशी अपेक्षा ठेवणं हे नितिमत्तेला धरून नाही.एक अपात्र,अयोग्य चहा आपल्या जगण्याच्या गुणवत्तेला सुरुंग लावू शकतो. So Say No To अयोग्य/अपात्र 'चहा'.एवढं सगळं आहे म्हणून मी ऑफिसमध्ये स्टाफ,सहकारी सोडून इतर कोणाचा 'चहा' पीत नाही...--दयाआनंद म्हणे...🤩❤️
(इथे चहा फक्त उदाहरणार्थ घेतला आहे.त्याठिकाणी इतर गोष्टी आपण ठेऊ शकता)

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

#चारित्र्य/इमेज/वर्तणूक

    माणसाने कसे वागावे अथवा वागू नये हे सांगण्यासाठी प्रत्येक समाज, संस्कृतीमध्ये काही सामाजिक नियम बनवले गेले आहेत.त्या नियमांचीच नंतर प्रथा,रीत झालेली असते.ती पद्धत जर आपण मोडली तर तो समाज आपल्यावर चारित्र्यभंगाचा आरोप करतो.थोडक्यात एखाद्या समाजात पैसे खाणे पाप समजले जात असेल आणि कोणी पैसे खाल्ले तर तो चारित्र्यहीन आहे असं समजलं जाईल पण दुसऱ्या समाजात असे अजिबात नसेल. 'चारित्र्य' चा मुळ अर्थ सगळीकडे जवळजवळ सारखा आहे पण त्याचे निकष सगळीकडे वेगवेगळे असतात.उदाहरण द्यायचे झाले तर काही समाजात चुलतभाऊ-बहीण यांनी लग्न केले तर ते चारित्र्यहीन कृत्य होते.तर काही समाजात तेच कृत्य चांगलं समजलं जातं.काही समाजात लग्न न करता एकत्र राहणे अजिबात वाईट समजले जात नाही तर काही समाजात तेच पाप आणि चारित्र्याचे उल्लंघन म्हणजे अनैतिक कृत्य समजले जाते.खरेतर, माणसाने समाजातील इतर कोणालाही,कसलेही नुकसान होईल, त्याला कसलाही त्रास होईल असं कृत्य करणे म्हणजे चारित्र्यभंग होतो.एखाद्याचं चांगलं-वाईट वागणं म्हणजे त्याच्या सवयी,त्याची व्यसने,आजूबाजूच्या माणसांशी त्याचे बरेवाईट वागणे,त्याची पत्नी सोडून तो इतर स्त्रियांशी कसा वागतो, त्याचा प्रामाणिकपणा किती आहे हे सगळं चारित्र्य ह्या गोष्टीत आपल्याकडे पाहिलं जातं.बहुतांश समाज-संस्कृतीमध्ये जिथे स्त्रीपुरुष यांना मुक्त वातावरण नसेल तिथे फक्त स्त्री किंवा पुरुष पती,पत्नी सोडून इतर पुरुष किंवा स्त्री यांच्याशी कसे संबंध ठेवतात ह्याला जास्त महत्व दिले जाते. थोडक्यात, तिथल्या समाजात अस्तित्वात असलेल्या नीतिनियम, कायदेकानुन ह्याचं पालन करणे म्हणजे चारित्र्य आणि त्याचं जेवढ्या प्रमाणात उल्लंघन करणार तेवढ्या प्रमाणात चारित्र्यभंग झाला असं म्हणतात.मुळात कायद्याने सज्ञान 1, 2 किंवा अनेक व्यक्ती जर कोणाचेही कसलेही नुकसान न करता,कोणताही प्रचलित कायदा न मोडता एखादी नैसर्गिक, स्वाभाविक गोष्ट करत असतील तर ती कृती/गोष्ट चारित्र्यहीन किंवा अनैतिक आहे असं अजिबात म्हणता कामा नये पण समाजात तसे घडत नाही.बऱ्याच वेळा समाजाला त्यांच्या म्हणण्यानुसार न वागणारा माणूस हा चारित्र्यहीन आहे असेच वाटत असते आणि मग त्याची प्रतिमा,इमेज खराब केली जाते.चोरी करणे पाप आहे असं आपण म्हणतो पण प्रत्येकाने आयुष्यात कधीना कधीतरी चोरी केलेली असतेच.तसेच प्रत्येकजण दुसऱ्याला 'चारित्र्य' ह्या गोष्टीवरून दोष देतो पण तो प्रत्येकजण आपल्या आयुष्यात कधीतरी, एकदातरी त्या गोष्टी करत असतोच.त्यामुळं प्रचलित निकष पकडायचे झाले तर जगात कोणीच संपूर्ण चारित्र्यसंपन्न मनुष्य सापडणार नाही.चारित्र्य ही फक्त स्वतःला सोडून, स्वतःच्या चुका पोटात घालून दुसऱ्याला नावे ठेवणे, बदनामी करणे ह्यासाठी हुकमी शस्त्र म्हणून हल्ली समाजात सर्रास वापरले जाते.त्यातही जे आयुष्यभर तथाकथित चारित्र्य जपायचे प्रयत्न करत असतात त्यांनाच चारित्र्यभंग होण्याचा धोका,भीती असते.पण जे पुर्वीपासूनच चारित्र्य, इमेज ह्या गोष्टीचा विचार करत नाहीत किंवा अजिबातच पर्वा करत नाहीत अशा लोकांना त्याची भीती नसते.चारित्र्य ही एक सामाजिक, समाज-संस्कृती-व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे.आणि त्याची व्याख्या बदलत जाणारी आहे.त्यातही तुमची कृती कोणी पाहिली, लोकांना समजली तरच त्यावर चांगलेवाईट असे लेबल लावले जाईल, जर चार भिंतीच्या आत तुम्ही काय करताय किंवा तुमच्या वैयक्तिक/Private आयुष्यात काय करताय, कसे वागताय किंवा बाहेरसुद्धा तुम्ही जे काही करताय ते जोपर्यंत समाजाला कळत नाही तोपर्यंत त्या कृत्याचा  'नामकरण' विधी होत नाही.आपण आपलं private आणि social life असं आपल्याला विलगीकरण करता आले पाहिजे.त्यामुळं आपण आपल्यापुरती एकच व्याख्या लक्षात ठेवावी.आपण ज्या प्रदेशात-समाजात राहत असतो त्यांच्या सामाजिक नियमांना अनुसरून आणि तिथला प्रचलित कायदा न मोडता, अनैसर्गिक कृत्य न करता, कोणाचीही आर्थिक-शारीरिक-मानसिक-सामाजिक हानी न करता, कोणताही डाग लागू न देता आणि अवास्तव-अवाजवी बंधने झुगारून स्वतःचा व्यक्तिविकास करणे.समाजात वावरत असताना त्याच्या चालीरितींकडे डोळेझाक करून, किंवा समाजाला फाट्यावर मारून आपण नीट जगूच शकत नाही तसेच अवास्तव-अवाजवी-अमानुष प्रथांचं जोखड वाहूनसुद्धा माणूस नीट जगू शकत नाही.
-दयानंद माने,सोलापूर

शुक्रवार, १९ मार्च, २०२१

कसंय ना...
मिळालेले अपयश,होणारे अपमान,मिळणारी हिणकस-कमीपणाची वागणूक,इतरांचं पाण्यात बघणं,शाळाकॉलेजात बॅकलॉगला राहिलेले विषय,झालेला/ले प्रेमभंग,रोज होणारे छोटेछोटे अपेक्षाभंग,हक्क असूनही नाकारले जाणे,आर्थिक संकटे,कित्येक गोष्टींची आयुष्यात राहिलेली उणीव,खूप इच्छूनपण सतत हुलकावणी देणारी स्वप्ने,अडथळे आणणारी अन् खच्चीकरण करणारी माणसे,झालेले विश्वासघात,जमीनदोस्त करणारे अपघात,आपल्या व्यवहार्य अशा तत्व-विचारांच्या विरोधात घडणाऱ्या- न पटणाऱ्या सामाजिक गोष्टी,आईबापांच्या अन् भावाबहिणीच्या,बायकोमुलांच्या डोळ्यातील अपूर्ण आकांक्षा आणि ओघळलेले अश्रूहे सगळं छुपी चीड निर्माण करतं आणि सळसळत्या उर्जेला,काहीतरी अभिनव करून दाखवण्याच्या उर्मिला जन्म देत असतं आणि कित्येक सुंदर गोष्टी प्रसृत करतं.
So,Enjoy Beauty of These Feelings Too.😃
#दयाआनंद म्हणे!

मंगळवार, १६ मार्च, २०२१

#लायटीच्या प्रकाशात एका अस्तित्व संपलेल्या 'चिमणीचे मनोगत...

'नमस्कार!!धिस इज कॉल्ड ऍज 'कंदील'.ह्यात मी बसले आहे.माझं नाव चिमणी, मी पूर्वी उजेड द्यायची.पण आत्ता 'लायटी'च्या 'प्रकाशा'त माझं अस्तित्व नाहीसं झालंय. आणि माझं खाद्यही रॉकेल हे रेशन दुकानात मिळणासं झालंय.पुर्वी उजेड कमी होता पण पारदर्शकता खूप होती.घरातल्या माणसांची मने मला आणि सगळ्यांना स्पष्ट,साफ दिसायची.आत्ता लायटीचा उजेड वाढला आणि माणसांची स्पष्ट दिसणारी मने अधिकच अंधुक, अस्पष्ट दिसू लागली.जेव्हा लाईट नव्हती तेव्हा लोकांना माझ्याशिवाय पर्याय नव्हता.पण आत्ता माझी गरज संपली आणि देव्हाऱ्याजवळ असणारी मी आत्ता भंगारात गेले.पण भंगारात जाऊन माझं अस्तित्व संपण्याचं मला दुःख नाही.माणसाची प्रगती झाली, त्याचं जीवन अधिक प्रकाशमय झालं ह्याच आनंदात मी सगळं विसरले.पण कुठेकुठे अजूनही माझी आठवण म्हणून अडगळीत का होईना मला जिवंत ठेवलं आहे.अंधारातून उजेडातला माणसाचा प्रवास मी पाहिला आहे.पूर्वी माणसांची मने माझ्या उजेडात खूप मोकळी व्हायची पण आत्ता 'चिमणी' नसूनही त्यांच्या मनावर  चिंता,भ्रम,अहंकार,गैरसमज यांची इतकी काजळी चढली आहे कि कोणाच्याच मनाचा थांग मला लागेनासा झालाय.मला पूर्वी ऐकु येणारा कोणाचाच मनमोकळा संवाद आत्ता ऐकू  येईनासा झालाय.माझं अस्तित्व अजूनही आदिवासी,दुर्गम भागात आहे.कधीकधी वाटतं कि इथं लाईट नकोच यायला. या आदिवासी लोकांमधला जो प्रेमाचा संवाद आहे तो तरी लायटीच्या उजेडात हरवायला नको.माझं अस्तित्व पूर्ण नाहीसं होण्याअगोदर पुन्हा एकदा शेवटचं, लायटीच्या उजेडात माणसांचा मनमोकळा संवाद मला ऐकायचा आहे....बस्स!
✍️✍️ श्री.दयाआनंद माने

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...