मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

#चारित्र्य/इमेज/वर्तणूक

    माणसाने कसे वागावे अथवा वागू नये हे सांगण्यासाठी प्रत्येक समाज, संस्कृतीमध्ये काही सामाजिक नियम बनवले गेले आहेत.त्या नियमांचीच नंतर प्रथा,रीत झालेली असते.ती पद्धत जर आपण मोडली तर तो समाज आपल्यावर चारित्र्यभंगाचा आरोप करतो.थोडक्यात एखाद्या समाजात पैसे खाणे पाप समजले जात असेल आणि कोणी पैसे खाल्ले तर तो चारित्र्यहीन आहे असं समजलं जाईल पण दुसऱ्या समाजात असे अजिबात नसेल. 'चारित्र्य' चा मुळ अर्थ सगळीकडे जवळजवळ सारखा आहे पण त्याचे निकष सगळीकडे वेगवेगळे असतात.उदाहरण द्यायचे झाले तर काही समाजात चुलतभाऊ-बहीण यांनी लग्न केले तर ते चारित्र्यहीन कृत्य होते.तर काही समाजात तेच कृत्य चांगलं समजलं जातं.काही समाजात लग्न न करता एकत्र राहणे अजिबात वाईट समजले जात नाही तर काही समाजात तेच पाप आणि चारित्र्याचे उल्लंघन म्हणजे अनैतिक कृत्य समजले जाते.खरेतर, माणसाने समाजातील इतर कोणालाही,कसलेही नुकसान होईल, त्याला कसलाही त्रास होईल असं कृत्य करणे म्हणजे चारित्र्यभंग होतो.एखाद्याचं चांगलं-वाईट वागणं म्हणजे त्याच्या सवयी,त्याची व्यसने,आजूबाजूच्या माणसांशी त्याचे बरेवाईट वागणे,त्याची पत्नी सोडून तो इतर स्त्रियांशी कसा वागतो, त्याचा प्रामाणिकपणा किती आहे हे सगळं चारित्र्य ह्या गोष्टीत आपल्याकडे पाहिलं जातं.बहुतांश समाज-संस्कृतीमध्ये जिथे स्त्रीपुरुष यांना मुक्त वातावरण नसेल तिथे फक्त स्त्री किंवा पुरुष पती,पत्नी सोडून इतर पुरुष किंवा स्त्री यांच्याशी कसे संबंध ठेवतात ह्याला जास्त महत्व दिले जाते. थोडक्यात, तिथल्या समाजात अस्तित्वात असलेल्या नीतिनियम, कायदेकानुन ह्याचं पालन करणे म्हणजे चारित्र्य आणि त्याचं जेवढ्या प्रमाणात उल्लंघन करणार तेवढ्या प्रमाणात चारित्र्यभंग झाला असं म्हणतात.मुळात कायद्याने सज्ञान 1, 2 किंवा अनेक व्यक्ती जर कोणाचेही कसलेही नुकसान न करता,कोणताही प्रचलित कायदा न मोडता एखादी नैसर्गिक, स्वाभाविक गोष्ट करत असतील तर ती कृती/गोष्ट चारित्र्यहीन किंवा अनैतिक आहे असं अजिबात म्हणता कामा नये पण समाजात तसे घडत नाही.बऱ्याच वेळा समाजाला त्यांच्या म्हणण्यानुसार न वागणारा माणूस हा चारित्र्यहीन आहे असेच वाटत असते आणि मग त्याची प्रतिमा,इमेज खराब केली जाते.चोरी करणे पाप आहे असं आपण म्हणतो पण प्रत्येकाने आयुष्यात कधीना कधीतरी चोरी केलेली असतेच.तसेच प्रत्येकजण दुसऱ्याला 'चारित्र्य' ह्या गोष्टीवरून दोष देतो पण तो प्रत्येकजण आपल्या आयुष्यात कधीतरी, एकदातरी त्या गोष्टी करत असतोच.त्यामुळं प्रचलित निकष पकडायचे झाले तर जगात कोणीच संपूर्ण चारित्र्यसंपन्न मनुष्य सापडणार नाही.चारित्र्य ही फक्त स्वतःला सोडून, स्वतःच्या चुका पोटात घालून दुसऱ्याला नावे ठेवणे, बदनामी करणे ह्यासाठी हुकमी शस्त्र म्हणून हल्ली समाजात सर्रास वापरले जाते.त्यातही जे आयुष्यभर तथाकथित चारित्र्य जपायचे प्रयत्न करत असतात त्यांनाच चारित्र्यभंग होण्याचा धोका,भीती असते.पण जे पुर्वीपासूनच चारित्र्य, इमेज ह्या गोष्टीचा विचार करत नाहीत किंवा अजिबातच पर्वा करत नाहीत अशा लोकांना त्याची भीती नसते.चारित्र्य ही एक सामाजिक, समाज-संस्कृती-व्यक्ती सापेक्ष संकल्पना आहे.आणि त्याची व्याख्या बदलत जाणारी आहे.त्यातही तुमची कृती कोणी पाहिली, लोकांना समजली तरच त्यावर चांगलेवाईट असे लेबल लावले जाईल, जर चार भिंतीच्या आत तुम्ही काय करताय किंवा तुमच्या वैयक्तिक/Private आयुष्यात काय करताय, कसे वागताय किंवा बाहेरसुद्धा तुम्ही जे काही करताय ते जोपर्यंत समाजाला कळत नाही तोपर्यंत त्या कृत्याचा  'नामकरण' विधी होत नाही.आपण आपलं private आणि social life असं आपल्याला विलगीकरण करता आले पाहिजे.त्यामुळं आपण आपल्यापुरती एकच व्याख्या लक्षात ठेवावी.आपण ज्या प्रदेशात-समाजात राहत असतो त्यांच्या सामाजिक नियमांना अनुसरून आणि तिथला प्रचलित कायदा न मोडता, अनैसर्गिक कृत्य न करता, कोणाचीही आर्थिक-शारीरिक-मानसिक-सामाजिक हानी न करता, कोणताही डाग लागू न देता आणि अवास्तव-अवाजवी बंधने झुगारून स्वतःचा व्यक्तिविकास करणे.समाजात वावरत असताना त्याच्या चालीरितींकडे डोळेझाक करून, किंवा समाजाला फाट्यावर मारून आपण नीट जगूच शकत नाही तसेच अवास्तव-अवाजवी-अमानुष प्रथांचं जोखड वाहूनसुद्धा माणूस नीट जगू शकत नाही.
-दयानंद माने,सोलापूर

#बालदिन...

आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यातलं लहान मूल(Child) कायम जिवंत राहिलं पाहिजे... बालमनाची निरागसता(Innocence) आपण शेवटपर्यंत जपली पाहिजे...मोठ...