#स्वगत...
एखाद्याला सहकार्य-मदत करताना, मला माहित असलेले किंवा येत असलेले कोणालाही शिकवताना,ज्यातलं मला थोडंफार कळतं त्याबद्दल सल्ला,माहिती देताना, एखाद्याशी चांगलं वागताना,चांगलं बोलताना,त्याच्यापासून मला काहीतरी फायदा होईल म्हणून मी हे करत नसतो.तसा कोणताही उद्देश मनात नसतो.पण माझं एक उद्दिष्ट नेहमी असतं,कि हे सगळं करताना लोकांचा त्रास कमी होतो,त्यांचा वेळ-पैसा-श्रम वाचतो. त्यामुळं ते खूष होतात, समाधानी होऊन थ्यांक्यु म्हणतात.आपल्याकडे पाहून काही लोक समाधानाने,कृतज्ञतेने मनापासून स्मितहास्य करतात आणि मग आपसूकच आपल्याला पण खूष आणि भारी वाटतं.
वास्तविक, मला आवडतं, मला भारी वाटतं म्हणून मी एखादी गोष्ट करतो. कोणीतरी चांगलं म्हणावं,कौतुक करावं किंवा माझं नाव व्हावं,मला प्रसिद्धी मिळावी किंवा कुठूनतरी माझा फायदा व्हावा म्हणून अजिबातच मी काही करत नाही.पण ह्यात एक अविभाज्य आणि सुंदर गोष्ट अशी आहे की,आपण अजिबात वाईट न वागता, कोणालाही जाणीवपूर्वक त्रास न देता शक्य तेवढं जितकं जास्तीत जास्त सहकार्य करू, आपुलकीने-प्रेमाने बोलू तितकं आपलं जगणं सहज आणि सोयीचं होतं. आपला उद्देश असो अथवा नसो पण आपण पेरलेले कुठेही आणि केव्हाही उगवतेच आणि आपल्या वाटेत येणाऱ्या संकटाला आधीच अडवते.आपली सगळी कामे आपण पेरलेल्या लोकांमुळे सहज होऊन जातात.म्हणजे उद्देश न ठेवतासुद्धा कामे तर होतातच पण अपवादाने कामे नाही झाली तरी उद्देश पूर्ण न झाल्याचा त्रास होत नाही. उलट आपण ठरवलेल्या काही तत्वांचा, नियमांचा अवलंब करून आपण स्वतःला खूष आणि संतुष्ट करत असतो.आपली भूमिका आपण शक्य तितकं कळकळीने आणि इमानदारीने वठवत आहोत हे समाधान ही गोष्टच जबरदस्त भारी आहे."मला हे करून छान वाटतं, मला हे करताना मजा येते म्हणून मी हे करतो.बस्स!"Thats It...!!
-दयानंद
(हे मला कोणीही विचारलं नाही बरं... मलाच स्वतःला प्रश्न पडला...मीच मला विचारलं दया एखादी गोष्ट आपण का करतो
आणि मीच मला उत्तर दिलं...तेच स्वगत...हितगुज माझं माझ्याशी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा